थरारक पाठलाग करत टोळीप्रमुखासह चौघांच्या मुसक्या आवळल्या, शिरवळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई,
62 एटीएमसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, आठ गुन्ह्यांचा उकल, अजूनही अनेक गुन्हे येणार उघडकीस
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेशात चोऱ्या
प्रतिनिधी / खंडाळा
एटीएम कार्डची अदलाबदल, कमिशनचे अमिष दाखवित महाराष्ट्रासह विविध राज्यात फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शिरवळ पोलिसांनी पर्दाफाश केला. आंतरराज्य टोळीच्या म्होरक्यासह चार जणांना आनेवाडी टोल नाक्यावर गोव्याहून परतताना चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करत अटक करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले.
दरम्यान, संबंधित टोळीकडून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातील विविध पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस येवून 62 विविध राष्ट्रीयकृत बँका, को- ऑफ रेटीव्ह बँकांची एटीएम कार्ड व कारसह सुमारे तीन लाख, आठ हजार शंभर रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रदीप साहेबराव पाटील (वय 29), विकी राजु वानखेडे (वय 21), किरण कचरू कोकणे (वय 35), महेश पांडुरंग घनगर (वय 31) सर्व रा. म्हारळगांव उल्हासनगर (ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका खासगी कंपनीत काम करणारे निलेश सुर्वे हे शिरवळमधील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये रक्कम काढण्यासाठी मित्रासमवेत गेले होते. त्यावेळी त्यांच्या मागे असलेल्या अज्ञात दोघांनी ते करत असलेले व्यवहार पाहिले, एटीएममधून पैसे न निघाल्यामुळे पावती पाहत असताना सुर्वे यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलत, त्याच बॅंकेचे दुसरे एटीएम कार्ड सुर्वे यांच्या हातात दिले. यावेळी निलेश सुर्वे यांच्या मोबाईलवर त्यांचे खात्यामधील रक्कम शिरवळ येथील एटीएममधून, तसेच वेळे व आसले (ता. वाई) येथील पेट्रोलपंपावरून अचानक पन्नास हजार आठशे दहा रुपये वजा झाल्याचा संदेश प्राप्त झाला. तेव्हा सुर्वे यांनी तत्काळ शिरवळ पोलीस ठाणे गाठत अनोळखी इसमांविरूध्द फसवणूक, चोरीचा गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यापूर्वी घडलेल्या अशा प्रकारच्या जुन्या सी. सी. टी.व्हीचे व गुह्याचे अवलोकन करित उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक सागर अरगडे, पोलीस अंमलदार रविंद्र कदम, जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे व सीसीटीव्हीची पाहणी करत, संशयित गुन्हेगारांच्या चोरीच्या पध्दतीचा अभ्यास केला. सदर गुन्हा हा उल्हासनगर (ठाणे ) येथील सराईत गुन्हेगारांनी केल्याचे निदर्शनास आले. संशयित गुन्हेगारांची माहिती घेत गोवा राज्यात गेल्याचे दिसून आले. शिरवळचे पोलीस निरिक्षक हजारे व त्यांच्या पोलीस पथकाने त्याच्या हालचालीचा मागोवा घेतला.
संशयित सराईत गुन्हेगार हे गोवा राज्यातुन परत उल्हासनगर- ठाणे या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळाली. शिरवळ पोलिसांनी वाढेफाटा व आनेवाडी टोलनाका येथे सापळा रचून थरारक पाठलाग करत पोलीस व आनेवाडी टोलनाका कर्मचाऱयांच्या सहकार्याने मोठÎा शिताफीने कारमधील संशयित प्रदीप साहेबराव पाटील (वय 29), विकी राजु वानखेडे (वय 21), किरण कचरू कोकणे (वय 35), महेश पांडुरंग घनगर (वय 31) सर्व रा. म्हारळगांव उल्हासनगर (ठाणे) यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुह्यांसह पडघा (ठाणे ग्रामीण), अहमदनगर येथील राहुरी, सांगोला जि. सोलापूर, पिंपरी-चिंचवड येथील भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. सराईत गुन्हेगारांची पार्श्वभूमी पाहिली असता संबधितांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हे केल्याचे तपासाअंती निष्पन्न झालेले आहे.
दरम्यान, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून तपास सुरू आहे. शिरवळ पोलिसांनी त्या संशयितांकडून 62 विविध राष्ट्रीयकृत बँका, को- ऑपरेटीव्ह बँकांची एटीएम कार्ड, कारसह तीन लाख आठ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर गुह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक अरगडे करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश हजारे, पोलीस उपनिरिक्षक सागर अरगडे, रविंद्र कदम, जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड, धीरज यादव, संतोष ननावरे, प्रकाश फरांदे, संजय जगताप, दत्तात्रय धायगुडे यांच्या पथकाने कारवाई केली
शिरवळ पोलिसांचा कस !
शिरवळ पोलिसांनी संशयित सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यानंतर तपासाअंती संबंधितांकडून तब्बल 62 विविध राष्ट्रीयकृत बँका, को- ऑफ रेटीव्ह बँकांची एटीएम कार्ड सापडल्याने पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. शिरवळ पोलिसांनी सलग दोन दिवस-रात्र विविध बँकेतील एटीएम कार्ड धारकांची माहिती व मोबाईल नंबर प्राप्त करून घेत, संपर्क साधला असता संबंधितांची मोठÎा प्रमाणात फसवणूक व चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी एटीएम कार्ड धारकाची माहिती घेताना शिरवळ पोलिसांचा कस लागला. तर सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत 24 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पोलीस ठाण्यामार्फत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असून यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.