प्रतिनिधी /पणजी :
नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कॉफी पेंटिंग स्पर्धेच्या दुसऱया आवृत्तीमध्ये 10 कलाकारांनी बाजी मारली आहे. या दहा कलाकारांमध्ये गोमंतकीय कलाकार कालिदास सातार्डेकर यांचाही समावेश आहे. सातार्डेकर यांच्या ‘साधू’ पेंटिंगला बक्षीस प्राप्त झाले आहे. स्पर्धेत जगातील उत्तमोत्तम कलाकारांनी सुमारे 500 कलाकृती सादर केल्या होत्या. सदर पेंटिंग्स साऊथ ईस्ट युरोप येथील कोस्वो येथे होणाऱया प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीचे प्रमुख अमित कपूर, बेसनिक झेमैली परीक्षक म्हणून लाभले होते. 80 टक्के कॉफी आणि 20 टक्के जलरंग पेंटिंग्समध्ये वापरण्यात आले होते. या स्पर्धेत निवडलेल्या कलाकारांची पेंटिंग्स दि. 25 ऑगस्ट रोजी होणाऱया उद्घाटन सोहळय़ात मांडण्यात येणार आहेत. कलाकारांना डिजिटल कॅटलॉग व डिजिटल सही केलेले प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे. 10 उत्कृष्ट पेटिंग्सना डेनियल स्मीथ वॉटर कलर्स आणि कॉफी एक्सेसरीज देण्यात येणार आहेत.
सातार्डेकर यांना राज्यस्तरीय कला पुरस्कार गोपाळकृष्ण ब्रदर्स, छोटा सिनेमा, मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार, स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ गोवा पुरस्कार, अबु रवश आंतरराष्ट्रीय कौतुकास्पद पुरस्कार व इतर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. यापूर्वी पाच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. रंगसंगतर्फे अत्यंत कौतुकास्पद पुरस्कार, तसेच 8 राज्य कला पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.