दोघांना अटक : 3.8 किलो चरस जप्त
प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळूरहून विदेशात कुरियरद्वारे ड्रग्जची वाहतूक करणाऱया दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी) ही कारवाई केली आहे. एच. हुसेन आणि आर. खान अशी अटकेतील ड्रग्ज पुरवठेदारांची नावे आहेत. त्यांच्याजवळून एकूण 3.8 किलो चरस जप्त करण्यात आला आहे. बेंगळूरहून कतारला कुरियरने अमली पदार्थांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱयांना मिळाली होती. त्यानुसार बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कतारला पाठविण्यात आलेल्या पार्सलची तपासणी करण्यात आली. त्यावेळी 13 बॅगांमध्ये शिलाईच्या आतील भागात 1.2 किलो चरस आढळून आले. त्यानंतर या प्रकरणाचा छडा लावताना एनसीबीच्या अधिकाऱयांनी मुळच्या केरळ येथील एच. हुसेन आणि आर. खान यांना अटक केली. त्यांच्याजवळून 2.6 किलो चरस जप्त करण्यात आले. हे अमली पदार्थ कासरगोडहून आणून बेंगळूर विमानतळावरून कतारला पाठविण्यात येत होते. या टोळीतील प्रमुखाला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती.