प्रतिनिधी/ पणजी
भारतासह अनेक देशांत अमलीपदार्थाचा व्यवहार करणारा आंतरराष्ट्रीय ड्रग्स पॅडलर संशयित आरोपी मुरात तास (47) याला अमलीपदार्थ विरोधी पोलीस पथकाने खालचा वाडा – हरमल येथे अटक केली असून त्याच्याकडून 71 लाख रुपयांचा उच्च प्रतीचा एमडीएमए अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे.
सदर संशयित आरोपी तुर्की सैन्यातील कमांडो होता. निवृत्तीनंतर त्याने युरोप, अमेरिका आदी देशात अमलीपदार्थ व्यवहार प्रारंभ केला. आता अनेक देशात त्याचे जाळे पसरले असून गोव्यात अमलीपदार्थ घेऊन येण्याची त्याची दुसरी वेळ असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. एमडीएमए हा अमलीपदार्थ पूर्णपणे रासायनिक असून अत्यंत तिक्ष्ण आणि घातक मानला जातो. त्याच्याकडे फक्त 1.710 ग्रॅम इतका अमलीपदार्थ सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किमत 71 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कागदाचे लहानसे चिटोरे असतात आणि त्यावर सुईच्या टोकावर मावेल एवढे अमलीपदार्थ चिकटवलेला असतो. हा अमलीपदार्थ विकत घेणारे अधिकतर विदेशी नागरिक असतात अशी माहिती या सूत्रांनी दिली.
घरमालकाची होणार चौकशी
सदर संशयितांची राहणी उच्च प्रतीची होती. खालचावाडा हरमल येथील एका घरात तो राहत होता. या घर मालकाकडून कायदेशीर सोपस्कार पाळण्यात आले आहेत की नाही याची तपासणी केली जाणार आहे.
अमलीपदार्थ विरोधी पोलीस पथकाचे अधिक्षक शोभित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदेश वेळीप व शशिकांत नाईक, उपनिरीक्षक प्रितेश मडगांवकर, रोहन मडगांवकर, अरुण देसाई, पोलीस कॉन्स्टेबल संदेश वळवईकर, सुशांत पागी, निकेत नाईक, मंदार नाईक, नितेश मुळगांवकर, धिरेन सावंत, रुपेश कांदोळकर, विष्णू हरमलकर, प्रसाद तेली, चंद्रू निगलूर व महिला कॉन्स्टेबल वेल्सीया फर्नांडिस यांनी ही कारवाई केली.