श्रीनगर / वृत्तसंस्था
बदलत्या जम्मू-काश्मीरचा आढावा घेण्यासाठी आणखी एक आंतरराष्ट्रीय पथक येथील दौऱयावर दाखल झाले आहे. युरोपीय संघाच्या अधिकाऱयांचा या पथकात समावेश असून पुढील दोन दिवस हे अधिकारी काश्मीरच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी या अधिकाऱयांनी बडगाम आणि श्रीनगर भागात पाहणी दौरा केला. या दौऱयात ते प्रशासकीय पातळीबरोबरच सुरक्षा, पर्यटन, भौगोलिक रचना आदींची पाहणी करतील. तसेच काही लोकांशीही ते प्रत्यक्षपणे संवाद साधणार आहेत. काश्मीरच्या विभाजनानंतर भेट देणारे हे तिसरे परराष्ट्रीय मंडळ आहे. प्रशासकीय पातळीवरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 24 सदस्यीय शिष्टमंडळ गुरुवारी जम्मूला भेट देणार आहे. यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
केंद्र सरकारने 2019 मध्ये जम्मू-काश्मीरसाठी असलेले कलम 370 हटवले होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने कलम 370 मध्ये दुरुस्ती करून जम्मू-काश्मीरचे विभाजन केले होते. त्यातून जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर काश्मीरमधील अनेक नियम बदलल्यामुळे येथील अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पथके आणि वैयक्तिक समूहही भारताकडे आकर्षित होत आहेत.