वृत्तसंस्था /पॅरिस
2022 साली होणाऱया विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या सध्या सुरू असलेल्या पात्र फेरी स्पर्धेतील सामन्यात बुधवारी पोर्तुगालने आयर्लंड प्रजासत्ताकचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. दुसऱया एका सामन्यात विद्यमान विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या फ्रान्सला बोस्निया आणि हर्जेगोविना संघाने 1-1 असे बरोबरीत रोखले.
अलीकडेच पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेड संघात पुनरागमन झाले आहे. यापूर्वी तो जुवेंट्स संघाकडून खेळत होता. आयर्लंड आणि पोर्तुगाल यांच्यातील पात्र फेरीच्या सामन्यात रोनाल्डोने पेनल्टीवरून मारलेला फटका आयर्लंडच्या गोलरक्षकाने थोपविला. तत्पूर्वी आयर्लंडने मध्यंतरापर्यंत पोर्तुगालवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. आयर्लंडचा हा एकमेव गोल जॉन इगेनने हेडरद्वारे नोंदविला. सामन्यातील 89 व्या मिनिटाला रोनाल्डोने नोंदविलेल्या गोलच्या आधारे पोर्तुगालने आयर्लंडशी बरोबरी साधली. आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातील रोनाल्डोचा हा 110 वा विक्रमी गोल आहे. यापूर्वी इराणच्या अली देईने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात 109 गोलांचा विक्रम केला होता. इंज्युरी टाईममध्ये 36 वषीय रोनाल्डोने पोर्तुगालचा आणि वैयक्तिक दुसरा गोल करून आपल्या संघाला या सामन्यात 3 गुण मिळवून दिले. पाचवेळा ‘बॅलन डीओर’ पुरस्कार मिळविणाऱया रोनाल्डोने सर्जिओ रॅमोसचा 180 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.