भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर सयांतन दास द्वितीय स्थानी
प्रतिनिधी / सांगली
पुरोहित चेस अकॅडमी, सांगली आणि इलाईट चेस प्लेअर्स युनियन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये कजाखिस्तानचा आंतरराष्ट्रीय मास्टर देनीस मखनेव हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने १०.५ गुणांसह विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत भारतासह कजाखिस्तान, अर्जेंटिना, जॉर्जिया , इराण, युक्रेन, अर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यांसह अनेक देशातील ग्रँडमास्टर्स, आंतरराष्ट्रीय मास्टर्स, फिडे मास्टर्स सहभागी झाले होते.
यामध्ये कजाखिस्तानचा आंतरराष्ट्रीय मास्टर देनीस मखनेव हा या स्पर्धेचा विजेता ठरला. पश्चिम बंगालचा आंतरराष्ट्रीय मास्टर सयांतन दास हा १० गुणांसह उपविजेता ठरला. कजाखिस्तानचा आंतरराष्ट्रीय मास्टर झांदोस अगमानोव्ह यास १० गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्षणे यास ९.५ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. आर्मेनियाचा ग्रँडमास्टर हाईक मातृस्यान यास ९ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले.
बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. तांत्रिक पंच म्हणून श्रेयस विवेक पुरोहित, दीपक वायचळ आणि शार्दूल तपासे यांनी काम पाहिले.