चिपळुणच्या शिवाजी मालवणकर यांची निर्मिती : सर्वोत्कृष्ट लघुपटासह परशुरामच्या आर्यनला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक : 5 देशातील 650 लघुपटातून निवड
प्रतिनिधी / चिपळूण
औरंगाबादमध्ये पार पडलेल्या रोशन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात येथील अभिनेते शिवाजी मालवणकर निर्मित ‘चित्रकार’ हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. या लघुपटामधील बालकलाकार आर्यन पाटील यानेही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. विविध देशांतून आलेल्या 650 लघुपटांतून चित्रकार आणि त्यातील बालकलाकार पाटील याची निवड झाली आहे.
औरंगाबादमध्ये पार पडलेल्या या महोत्सवात जगभरातील 15 देशांतून 650 लघुपटांनी सहभाग नोंदवला होता. यात मालवणकर निर्मित, नंदा आचरेकर लिखित चित्रकार या लघुपटाने सर्वोकृष्ट लघुपट व परशुराम येथील बालकलाकार आर्यन पाटील याने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार पटकावला.
यशराज इन्फस्ट्रक्चर्स ऍन्ड डेव्हलपर्सचे सतीश मेटे, लेखक-दिग्दर्शक सुभाष तायड़े-पाटीन, मराठी चित्रपट निर्माते अरुण गरड, संस्थापक संस्कृति ग्लोबल इंग्लिश स्कूलचे बाबासाहेब मोराळकर, सतीश तायडे, रोशनी फिल्म फेस्टिवलचे आयोजक सागर जाधव यांनी लघुपटाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजक थोरात यांनी बालकलाकार आर्यनशी संवाद साधून त्याच्या अभिनयाचे कौतुक करत त्याला पुढील आगामी चित्रपटात संधी देण्याचे आश्वासन दिले.
बालकलाकार आर्यनला गेल्या 7 महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या महोत्सवात 18 सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाले आहेत. तेलंगाना राज्यातर्फे घेण्यात आलेल्या महोत्सवातही त्याला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळाला आहे. केरळ, कोलकाता व बिहार येथेही त्याला पुरस्कार मिळाले आहेत. सध्या आर्यनची भूमिका असलेल्या ‘प्रतीक्षा’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. येत्या एप्रिलमध्ये तो राज्यभर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या यशात त्याच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे.