10 ते 13 डिसेंबरपर्यंत आयोजन : नामवंतांची व्याख्याने, चर्चा व परिसंवादाचे आयोजन
प्रतिनिधी / पणजी
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 (इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल) गोव्यात आयोजित करण्यात आला असून तो 10 ते 13 डिसेंबर 2021 या कालावधीत होणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आखण्यात आला आहे. त्यासंदर्भात अलीकडेच एक बैठक होऊन त्यात हा महोत्सव करण्याचे निश्चित झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपल्यानंतर 10 दिवसांनी हा विज्ञान महोत्सव घेतला जाणार आहे.
विज्ञानाशी संबंधित सर्वजण तसेच सरकारी खाती यांनी महोत्सवाला सर्वते सहकार्य करावे आणि पाठिंबा देऊन तो यशस्वी करावा, असे निर्देश डॉ. सावंत यांनी दिले आहेत. दोन्ही मंत्रालयांच्या पुढाकाराने हा महोत्सव गोवा राज्यात होणार असून त्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या निमित्ताने नामवंत वैज्ञानिक, विज्ञान क्षेत्रातील मान्यवर मंडळी गोव्यात येणार असून महोत्सवात सहभागी होणार आहेत. विज्ञानाची चळवळ, जागृती पुढे नेण्यासाठीचा एक भाग म्हणून हा महोत्सव होणार असून त्यात नामवंतांची व्याख्याने, चर्चा, परिसंवाद असे विविध कार्यक्रम समाविष्ट आहेत. गोवा राज्यातील विज्ञान क्षेत्रातील मंडळी, विद्यार्थीवर्ग यांना हा महोत्सव म्हणजे पर्वणीच ठरणार आहे.