नवी दिल्ली /
देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी जून अखेरपर्यंत वाढण्यात आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी असली तरी विमानांद्वारे होणारी मालवाहतूनक व कार्गो ऑपरेशन कुरिअर सेवा सुरू राहणार आहे. देशातील कोरोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनायाने (डीजीसीए) शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारने कोरोना संसर्ग प्रतिबंधक कडक निर्बंध 30 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘डीजीसीए’नेही सर्वसामान्य प्रवाशांसाठीची आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता 30 जूनपर्यंत भारतामधून व भारतासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी वाढण्यात आली आहे. या प्रवासबंदीला आणखी मुदतवाढ द्यायची की नाही याबाबतचा निर्णय देश-विदेशातील कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर जून महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात घेतला जाऊ शकतो.