नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगभरात आणि देशात ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावाची शक्मयता विचारात घेऊन 31 जानेवारी 2022 पर्यंत नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला. ‘डीजीसीए’ने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत. यापूर्वी झालेल्या निर्णयानुसार 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा विचार होता. मात्र, जगातील काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे विमानसेवा स्थगितीचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे. तथापि, इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे निर्बंध लागू होणार नाहीत. त्याबरोबरच काही मार्गांवर अधिकारी आणि महत्त्वाच्या व्यक्तींना परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे विमानसेवा सुरु करण्याच्या कालावधीत आणखी वाढ करण्यात आली आहे.
केंद्र सरकारनेही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱया देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणे अनिवार्य असणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना ओमिक्रॉन व्हेरियंटची बाधा झाल्यास त्यांना स्थानिक वाणिज्य दुतावातांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. भारतात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी ठप्प होती. मात्र, ‘वंदे भारत’ आणि कोव्हिड बबल नियमांनुसार, विमानसेवा सुरू होती. आता पुन्हा जगाची धाकधुक वाढवणाऱया ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत.