ऑनलाईन टीम / मेरठ :
‘शूटर दादी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या, राष्ट्रीय स्तरावर 50 पेक्षा अधिक पदके जिंकणाऱ्या चंद्रो तोमर यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना संक्रमणातच ‘ब्रेन हॅमरेज’मुळे चंद्रो तोमर यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळत आहे. त्या 89 वर्षांच्या होत्या.
26 एप्रिल रोजी चंद्रो तोमर या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यांना बागपतच्या आनंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारासाठी गुरुवारी त्यांना मेरठच्या मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. कोरोना संक्रमित आढळल्यानंतर चंद्रो तोमर यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली होती. ‘चंद्रो तोमर या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’ असे या ट्विटमध्ये म्हटले होते.
- चंद्रो तोमर यांच्याबद्दल :
चंद्रो तोमर यांना ‘शूटर दादी’ या नावाने ओळखले जाते. दादीचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील जोहडी. आजही त्या गावात प्रचंड गरीबी आहे. 1999 साली या गावात पहिली शूटिंग रेंज उभारण्यात आली. चंद्रो तोमर दादी आपल्या नातीला या रेंजमध्ये घेऊन शिकवण्यासाठी भरती करायला गेली. एके दिवशी दादीने पिस्तूलमध्ये काडतूस घातले आणि निशाणा लावला. तो निशाणा अगदी अचूक लागला.
त्यावेळी त्यांना एका प्रशिक्षकांने सांगितले की, दादी तुम्हीही शूटिंग शिकायला या. त्या दिवशी दादीची हिंमत आणि विश्वास वाढला आणि वयाच्या 65 व्या वर्षी तिच्या शूटिंगच्या प्रवासाला सुरुवात झाली. आतापर्यंत दादीने 25 पेक्षा जास्त मेडल जिंकले आहेत.
दादी स्त्रीवाद्यांसाठी आदर्श आहे आणि गेल्या 20 वर्षात तिने अनेक मुलींना शूटिंगमध्ये प्रशिक्षण दिले आहे. चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर ‘सांड की ऑंख’ नावाचा एक हिंदी चित्रपटही बनवण्यात आला आहे.