पुष्कर कशाळीकरची कामगिरी : यजमान भारतासह कॅनडा, लंडन येथून सायकलपटूंचा सहभाग
- भारतीय लष्करी अधिकाऱयांनीही घेतला स्पर्धेत सहभाग
- पुरुष गटात कॅनडातून सहभागी मयांक त्रिपाठी ठरला विजेता
- अवघ्या चोविस तासात 772 किलोमिटरचे अंतर पार
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कुणास हे सांगून तरी पटणार आहे का… जगातील पहिल्या 24 तासांच्या ‘व्हर्च्युअल अल्ट्रा टाईम ट्रायल’ आंतरराष्ट्रीय सायकल चॅम्पियनशिप स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याचा बहुमान आपल्या सिंधुदुर्गला मिळालाय ते? पण हो! हे सत्य आहे. सिंधुदुर्गचा सुपुत्र व अल्ट्रा सायकलिस्ट पुष्कर कशाळीकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने थेट सावंतवाडीत बसून डिजिटल तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करीत सहकाऱयांच्या मदतीने हे शिवधनुष्य लिलया पेलले व आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्गचा झेंडा फडकवला. या व्हर्च्युअल सायकलिंग स्पर्धेत कॅनडा येथून सहभागी झालेला सायकलपटू मयांक त्रिपाटी विजेता ठरला. त्याने 24 तासात तब्बल 772 किलोमिटर अंतर पार केले.
पुष्करने सहकाऱयांच्या मदतीने स्थापन केलेल्या ‘इर्रेग्युलर’ या संस्थेच्या माध्यमातून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 350 आणि 680 किलोमिटर अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी 12 आणि 24 तासांचा वेळ देण्यात आला होता. या स्पर्धेत यजमान भारतासह कॅनडा, इंग्लंड त्याचप्रमाणे भारतीय सेनेतील सायकलपटूदेखील सहभागी झाले होते.
साहसी सायकलिंग करीत असतानाच पुष्कर मागील दोन वर्षांपासून ‘टाईम ट्रायल सायकल स्पर्धा’ आयोजनाकडे वळला. त्याने महाराष्ट्रातील काही नामवंत सायकलपटूंना सोबत घेत ‘इर्रेग्युलर’ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्याने वर्षभरापूर्वी जगातील सर्वाधिक उंचीवरील लालालॅन्ड हिमाचल अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेचे तसेच ‘मँगोट्रान्स’ या भारतातील पहिल्या सेल्फ सपोर्टेड अल्ट्रा सायकल स्पर्धेचे यशस्वी आयेजन करून दाखवले. या दोन्ही स्पर्धांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर पुष्करने यावर्षी तब्बल 14 राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले होते. परंतु, संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे या सर्व आयोजनावर पाणी पडले. मात्र निराश न होता पुष्करने नेटवरून काही देशांमध्ये होणाऱया इनडोअर व्हर्चुअल सायकल स्पर्धांची माहिती घेतली व त्यातून प्रेरणा घेत त्याने जगातील या सर्वाधिक अंतराच्या आणि जागतिक स्तरावर पहिल्यांदाच पार पडणाऱया ‘व्हर्च्युअल अल्ट्रा टाईम ट्रायल’ चॅम्पियनशिप स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आणि तेही लॉकडाऊनचे पालन करीत अगदी घरात बसून.
स्पर्धेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
या अनोख्या स्पर्धेबाबत बोलताना पुष्कर म्हणाला, या स्पर्धेचे आयोजन खरं तर आमच्यासमोर मोठे चॅलेंज होते. कारण हा प्रकारच अनोखा होता. ‘व्हर्च्युअल सायकलिंग कॉम्पिटिशन’ म्हणजे आपणास प्रत्यक्ष सायकलिंग करण्यासाठी बाहेर रस्त्यावर जावे लागत नाही. घरात राहून आपण सायकलिंग करू शकतो. यासाठी चालण्यासाठी वापरल्या जाणाऱया ट्रेडमिलसारखे ‘ट्रेनर’ नावाचे एक यंत्र असते. या यंत्रावर सायकलचे मागचे चाक ठेवून सायकल चालविली जाते. सायकल चालविताना रस्त्यावरील चढउताराप्रमाणे सायकलपटूंना ताकद लावावी लागते. ही सायकल चालताना ती एकाच जागी असते. यावेळी केल्या जाणाऱया सायकलिंगसाठी लागणारी शारीरिक ताकद कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून वॅटस्मध्ये मोजली जाते व ती त्या सायकल प्रोग्रॅमिंगमध्ये रिप्लेक्ट होते. यासाठी ‘झ्यूप्ट’ नावाचा एक विशिष्ठ डिजिटल प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. थोडक्यात ‘पब्जी’ प्रमाणे एकाच वेळी विविध ठिकाणवरून स्पर्धक या ऍप्सद्वारे स्पर्धेत उतरू शकतात. मोबाईल अथवा लॅपटॉप द्वारे ऑनलाईन लाईव्ह परफॉर्मन्स आयोजकांकडे पाठवू शकतात. अशा प्रकारच्या सायकल स्पर्धेला ‘व्हर्च्युअल सायकल कॉम्पिटिशन’ म्हणतात. या पद्धतीचा वापर करीत टाईम ट्रायल प्रकारातील या सायकल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात यशस्वी झाल्याचे पुष्करने सांगितले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांवर ऑनलाईन लक्ष ठेवण्यासाठी सावंतवाडी, मुंबई व दिल्ली येथून एकूण तीन नियंत्रण सेंटर्स तयार करण्यात आली होती. यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट टिम’ नावाच्या डिजिटल ऍप्सची देखील मदत घेण्यात आली. या स्पर्धेत मुळचे भारतीय असलेले परंतु, सध्या लंडन व कॅनडा येथे राहत असलेले दोन सायकलपटू सहभागी झाले होते. तसेच भारतीय सेनेतील तीन अधिकारीदेखील सहभागी झाले होते. या स्पर्धेत यशस्वी फिनिशर होणाऱयांसाठी सहभागी होण्याऱया स्पर्धकांना 12 तासास पुरुषांसाठी 350, तर महिला स्पर्धकांसाठी किमान 315 किलोमिटर अंतर पार करण्याची अट ठेवण्यात आली होती. तर 24 तासांच्या गटात पुरुषांसाठी 680 किलोमिटर, तर महिलांसाठी 635 किलोमिटर अंतर पार करण्याची अट ठेवण्यात आली होती, असेही पुष्कर म्हणाला.