ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाने (BSF) बुधवारी एका हेरॉइन तस्कराची हत्या केली. त्याच्याकडून 135 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सीमा चौकी हिरानगर सेक्टरमधील पंसार भागात ही घटना घडली. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हेरॉइन तस्कराला सीमेपलीकडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पाहिले. त्यानंतर त्याला जवानांनी हटकले. त्यावेळी तेथून पळून जाण्यास सुरवात केली. त्यानंतर सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात या तस्कराचा मृत्यू झाला. या तस्करची ओळख अद्याप समजू शकलेली नाही. त्याच्या ताब्यातील 135 कोटी रुपयांचे हेरॉईन सुरक्षा दलाने जप्त केले आहे.