पोलिसांना धक्काबुक्की करून हल्ल्याचा प्रयत्न : 25 जणांना अटक
प्रतिनिधी /बेंगळूर
ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आफ्रिकन युवकाचा मृत्यू झाल्याने विदेशी नागरिकांनी जे. सी. नगर पोलीस स्थानकासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करून हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी प्रक्षुब्ध आंदोलकांवर लाठीमार केला.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, काही दिवसांपूर्वी काँगो देशातील जॉन उर्फ जोएल मलू नामक युवकाला ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याजवळ 5 ग्रॅम एमडीएम आढळले होते. रविवारी त्याची पोलीस स्थानकात चौकशी करण्यात आली. सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास त्याच्या छातीत वेदना जावणू लागल्या. त्यामुळे त्याला चिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराने जोएलचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. हे प्रकरण चौकशीसाठी सोपविण्यात आले आहे.
दरम्यान, जोएलच्या मृत्यूचे वृत्त समजताच आफिकेच्या विविध देशांतील नागरिकांनी जे. सी. नगर पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या छळामुळेच जोएलचा मृत्यू झाला आहे, असा आरोप केला. यावेळी पोलिसांना धक्काबुक्की करून हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. यावेळी 25 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. जोएल हा 2015 मध्ये विद्यार्थी व्हिसा मिळवून शिक्षणासाठी बेंगळूरला आला होता. 2017 मध्येच त्याच्या व्हिसाची मुदत संपल्याचे समजते.