प्रतिनिधी / फलटण :
श्रीराम सहकारी साखर कारखान्याकडे 176 सेवानिवृत्त कामगारांच्या 2017 ते 2020 या कालावधीमधील थकीत ग्रॅच्युइटीची रक्कम येणे बाकी होती. गेली 58 दिवस सेवानिवृत्त कामगारांनी येतील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने 5 कोटी 67 लाख रुपये आज दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी कामगारांच्या बॅंक खात्यात जमा केले. कामगारांची ऐकी, आंदोलनाचा रेटा आणि चळवळ यांच्यामुळेच ग्रॅच्युइटीची थकीत रक्कम कारखाना व्यवस्थापनाला देणे भाग पडले असल्याची प्रतिक्रिया फलटण तालुका संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या हस्ते उपोषण करणाऱ्या कामगारांना लिंबु सरबत देऊन फटाक्यांच्या आतषबाजीत उपोषण समाप्त करण्यात आले.
गेली 58 दिवस या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर सेवानिवृत्त साखर कामगारांनी चक्री उपोषण सारखे आंदोलन केले. पाच सण आंदोलन काळात गेले दीपावलीचा सणही आंदोलनात जातोय की काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र कारखाना व्यवस्थापकांना या गोष्टीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत ग्रॅच्युइटीची सुमारे 5 कोटी 67 लाख रुपये रक्कम देणे भाग पडले. असे मत ॲड निकम यांनी या प्रसंगी व्यक्त केले.