मंत्री डॉ. के. सुधाकर : मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार
प्रतिनिधी / बेंगळूर
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन आणि मेळाव्यांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे, असे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
आपल्या मतानुसार आंदोलन आणि मेळाव्यांना परवानगी न देणे योग्य आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यानुसार आंदोलनाला आपला विरोध नाही. पण पुढील संकटांचा विचार न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. आंदोलनासाठी ही वेळ योग्य नाही. गटागटाने बेंगळूरला न येण्याची मागणी आपण सर्व समुदायाच्या नेत्यांकडे करणार आहे, असेही ते म्हणाले.
बेंगळूर शहर जिल्हा सोडल्यास मंगळूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. मंगळुरात बाहेरून येणाऱया नागरिकांची संख्या अधिक असल्याने त्यांची तपासणी करण्याची सूचना अधिकाऱयांना केली आहे. याचबरोबर म्हैसूर, चामराजनगर, उडुपी, कोडगू, बेळगाव, तुमकूर जिल्हय़ातही रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तेथील जिल्हा प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलावीत. पुढील आठवडय़ात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी या जिल्हय़ातील जिल्हाधिकाऱयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून चर्चा करणार आहेत.
नागरिकांनी कोरोनाकडे साफ दुर्लक्ष करीत रुग्णालयात उशिरा दाखल होत आहेत. कोरोना मार्गसूचीकडे नागरिकांनी पुन्हा दुर्लक्ष केल्यास राज्यातील कोरोना परिस्थिती आवाक्या बाहेर जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.