पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त
वृत्तसंस्था/ हैदराबाद
अविभाजित आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते 88 वर्षीय कोनिजेति रोसैया यांचे शनिवारी सकाळी हैदराबाद येथील एका रुग्णालयात निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. रोसैया यांनी जनहिताकरता केलेले काम आणि त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी रोसैया यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत शोकाकुल कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
रोसैया 31 ऑगस्ट 2011 पासून 30 ऑगस्ट 2016 पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल राहिले होते. रोसैया यांनी स्वतःचा राजकीय प्रवास 1968 मध्ये विधान परिषदेचा सदस्य म्हणून सुरू केला होता. एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू झाल्यावर रोसैया यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. रोसैया यांनी 3 सप्टेंबर 2009 ते 24 नोव्हेंबर 2010 पर्यंत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.
मुख्यमंत्रिपद सोडल्यावर त्यांनी 2001-2016 या कालावधीत तामिळनाडूचे राज्यपालपद भूषविले होते. तामिळनाडूचे राज्यपाल होण्यापूर्वी त्यांनी कर्नाटकचे राज्यपाल म्हणून दोन महिने काम केले होते. तत्पूर्वी त्यांनी आंध्रप्रदेशचे अर्थमंत्री म्हणून कार्य केले होते. उच्चांकी 15 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा गौरव त्यांना प्राप्त होता.