वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम :
आंध्रप्रदेशच्या विजयवाडामध्ये कोरोना विषाणूची अजब प्रकरणे समोर येत आहे. तेथील एका एआरटी केंद्रात काम करणाऱया डॉक्टरचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. या डॉक्टरमध्ये कोरोना संसर्गाची कुठलीच लक्षणे दिसून आली नव्हती, यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या डॉक्टरला श्वास घेण्यास त्रास झाल्यावर छातीचा एक्सरे काढून त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्याच्या दुसऱयाच दिवशी डॉक्टरचा मृत्यू ओढवला आहे. अशाप्रकारची प्रकरणे राज्यात सातत्याने वाढत आहे.
संबंधित डॉक्टर विजयवाडाच्या संयुक्त चिकित्सालयातील एआरटीमध्ये तैनात होता. तो नेहमीप्रमाणे रुग्णांवर उपचार करत होता. त्याला कुठलाच त्रास नव्हता तसेच लक्षणेही दिसून आली नव्हती. डॉक्टरला अचानक श्वास घेण्यास त्रास झाला आणि दुसऱयाच दिवशी मृत्यू ओढवला आहे.
सुमारे 200 जणांचा मृत्यू
पूर्व गोदावरी जिल्हय़ाच्या पेडापुडी आणि परिसरात अशाप्रकारची किमान 200 प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व रुग्णांमध्ये कुठलीच लक्षणे दिसून आली नव्हती. या सर्वांना अचानक त्रास सुरू झाला आणि संसर्ग झाल्याचे कळताच त्यांचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी रुग्णालयात दाखल झाल्याच्या एका तासातच अखेरचा श्वास घेतला आहे.
राज्याची चिंता वाढली
अशाप्रकारची प्रकरणे अन्य जिल्हय़ांमध्येही दिसून येत आहेत. तेथेही रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. श्वास घेण्यास त्रास होतो आणि एक-दोन दिवसात संबंधिताला जीव गमवावा लागत आहे.
अवयवांना पोहोचतेय नुकसान
लक्षणेरहित रुग्ण बाहेरून सुदृढ दिसून येत असले तरीही शरीरात विषाणू त्यांच्या अवयवांना नुकसान पोहोचवित असतो. अशा रुग्णांच्या शरीरात रक्तातील प्राणवायूची पातळी खालावते. अशाप्रकारच्या रुग्णांना केवळ त्यांची रोगप्रतिकारशक्तीच वाचवू शकते असे डॉक्टरांनी म्हटले आहे. अशाप्रकारचा धोका असलेल्यांना त्वरित चाचणी करणेचे गरजेचे आहे.