80 वर्षीय वृद्धाच्या मृतदेहाला खांद्यावरून नेले- समाजमाध्यमांवर चर्चा
वृत्तसंस्था / श्रीकाकुलम
आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्हय़ात एका महिला उपनिरीक्षकाने कर्तव्यपूर्तीचे अनोखे उदाहरण सादर केले आहे. 80 वर्षीय बेघर तसेच असहाय्य वृद्धाचा बेवरास मृतदेह या महिला अधिकाऱयाने स्वतःच्या खांद्यावरून एक किलोमीटर अंतरापर्यंत नेला आहे. ही घटना काजू क्षेत्रासाठी प्रसिद्ध कासीबुग्गा-पलासा भागात घडली आहे. पोलीस महासंचालक गौतम सावांग यांनी महिला अधिकाऱयाच्या मानवतावादी भूमिकेचे कौतुक पेले आहे.
एका अज्ञात मृतदेहाची माहिती मिळाली होती. स्थानिक लोकांनुसार तो भिकाऱयाचा होता. शेतानजीक पडलेल्या मृतदेहला वाहनापर्यंत आणण्यासाठी रस्ता नव्हता. आम्ही ग्रामस्थांना आवाहन केले, पण कुणीच पुढे आले नाही, असे महिला उपनिरीक्षक कोट्टूरू सिरिशा यांनी सांगितले आहे.
भूकेने मृत्यू
विशाखापट्टणमच्या रहिवासी असलेल्या कोट्टूरू यांनी औषधशास्त्राचे शिक्षण घेतलेले आहे. मृतदेहावर जखमांच्या खुणा नसल्याने मृत्यूचे कारण संशयास्पद मानण्याची स्थिती नव्हती. वृद्धाचा भुकेमुळे मृत्यू झाल्याचे वाटत होते. मृतदेह नेण्यासाठी कुणीच समोर न आल्याने महिला अधिकाऱयानेच पुढे सरसावत मेकशिफ्ट स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतला. या कामात त्यांनी एका ट्रस्टच्या सदस्यांची मदत घेतली. पोलिसांच्या वाहनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 25 मिनिटांचा कालावधी लागला, हा प्रकार पाहून काही ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारांसाठी पुढाकार घेतला आहे.
केवळ कर्तव्य बजावले
मला पोलीस गणवेशात पाहण्याचे वडिलांचे स्वप्न होते, असे 12 वर्षीय मुलाच्या आई असलेल्या सिरिशा यांनी म्हटले आहे. लोकांची सेवा करण्यासाठी पोलीस विभागात रुजू झाले आहे. समाजाला स्वतःची सेवा देणे हेच माझे उद्दिष्ठ आहे. मृतालाही सन्मानाचा अधिकार असून मी केवळ स्वतःचे कर्तव्य बजावल्याचे उद्गार त्यांनी काढले
आहेत.