विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशात आणखी एका मंदिरातील देवाची मूर्ती तोडण्यात आली आहे. पूर्व गोदावरी जिल्हय़ाच्या राजमहेंद्रवरम शहरातील गणेश मंदिरात ही घटना घडली आहे. तेथील भगवान सुब्रमण्येश्वर यांची मूर्ती तोडण्यात आली आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये आक्रोश आहे. तर सत्तारुढ वायएसआर काँग्रेसने यामागे तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. एका आठवडय़ात दुसऱयांदा देवांच्या मूर्तींना धक्का पोहोचविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी विजयनगरम जिल्हय़ाच्या रामतीर्थम गावात भगवान रामाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. या घटनांमागे समाजकंटकांचा हात असावा असे पोलिसांनी म्हटले आहे. अशा घटनांप्रकरणी राजकारण सुरू झाले असून वायएसआर काँग्रेस आणि तेदेप परस्परांवर आरोप करत आहेत.