निवडणूक आयोगाचा निर्णय
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आंध्रप्रदेश आणि तेलगंणातील विधान परिषदेच्या 9 जागांवर होणारी निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय गुरुवारी केला आहे. आंध्रप्रदेश विधान परिषदेच्या 3 तीन सदस्यांचा आणि तेलंगणा विधान परिषदेच्या 6 सदस्यांचा कार्यकाळ अनुक्रमे 31 मे आणि 3 जून रोजी समाप्त होत आहे. या सर्व जागांवर विधानसभेच्या सदस्यांकडून निवड होणार आहे. निवडणूक नियमांनुसार विधान परिषद सदस्यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वीच निवडणूक घेत त्या जागा भरणे आवश्यक असते. कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा विधान परिषदेची निवडणूक स्थितीत सुधारणा होईपर्यंत करविणे योग्य नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. सर्व पैलू विचारात घेत या मुद्दय़ावर ‘भविष्यात योग्यवेळी’ निर्णय घेतला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.