- लक्षद्वीपमध्ये 7 दिवस संपूर्ण लॉकडाऊन
ऑनलाईन टीम / हैदराबाद :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आंध्र प्रदेश सरकारने राज्यात सुरू असलेला कोरोना कर्फ्यू 10 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. तर लक्षद्वीपमध्ये संपूर्ण 7 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे, त्याची सुरुवात आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. याबाबतची मुख्यमंत्री कार्यालयाने एक ट्विट करत माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी आज एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत 10 दिवस कोरोना कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
- 5 मे पासून प्रदेशात जारी आहे कोरोना कर्फ्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रदेशात 5 मे ते 31 मे पर्यंत कर्फ्यू जारी करण्यात आला होता. प्रदेशात रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे, पण रुग्ण संख्या पुन्हा वाढू नये यासाठी आज पुन्हा एकदा कर्फ्यूमध्ये आणखी 10 दिवस वाढ करण्यात आली आहे.
- कलम 144 देखील लागू
अधिकाऱ्यांनी सांगितले, कोविड कर्फ्यू रोज दुपारी 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असेल. सीआरपीसी कलम 144 च्या अंतर्गत निषेधाज्ञा सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत चालू राहील.
- राज्यात 15 लाख पेक्षा अधिक रुग्ण कोविडमुक्त!
आंध्र प्रदेशात रविवारी सायंकाळी कोरोनाचे 13,400 नवे रुग्ण आढळून आले. तर 94 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच 21, 133 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण रुग्णांची संख्या 16,85,132 वर पोहचली असून त्यातील 15,08,515 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 10,832 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 1,65,795 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.