भाच्यासह तिघे गंभीर जखमी : हल्लेखोर पसार
वार्ताहर / हिंडलगा
जमीन वादातून भरदिवसा बंदुकीच्या गोळय़ा घालून एकाचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवार दि. 8 रोजी दुपारी आंबेवाडी येथे घडली. सख्ख्या मामानेच भाच्यावर हा खुनी हल्ला केला असून घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला आहे.
अमित बाबुराव पावले (वय 42) हा हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याची पत्नी नीता अमित पावले व दहा वर्षाच्या मुलावरदेखील प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत तिघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत काकती पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हल्लेखोर खाचू मोनिंग तरळे व अमित पावले यांच्यामध्ये जमिनीच्या वाटणीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद धुमसत होता. शिवाय न्यायालयातही खटला सुरू आहे. तरीही शनिवारी दुपारी अमित हा पत्नी व मुलासह औषध फवारणी करण्यासाठी शेताकडे निघाला होता. यावेळी वाटेत आधीच दबा धरून बसलेल्या खाचू तरळे याने भरगल्लीत डबलबार बंदुकीने आधी हवेत गोळीबार केला. त्यानंतर थेट अमितच्या अंगावर दोन गोळय़ा झाडल्या. यापैकी एक गोळी डोके व खांद्याला घासून गेल्याने जखमी झालेल्या अमितवर पुन्हा बांबू घेऊन डोक्यात जोरदार वार केले.
यावेळी सोडविण्यास गेलेल्या पत्नी व लहान मुलावरही हल्ला केल्याने तिघेही जखमी झाले आहेत. यापैकी अमितची प्रकृती चिंताजनक बनली असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना केएलईएस रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी तपास सुरू केला असून फरारी आरोपीचा शोध घेत आहेत.