वार्ताहर / हिंडलगा
जमिन वादातून भरदिवसा बंदुकीच्या गोळय़ा घालून एकाचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी 8 ऑगस्ट रोजी दुपारी आंबेवाडी येथे घडली.सख्ख्या मामानेच भाच्यावर हल्ला केला आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाला आहे.
अमित बाबूराव पावले वय 42 हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. तर त्याची पत्नी निता अमित पावले व दहा वर्षाच्या मुलावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ते दोघही गंभीर जखमी अवस्थेत आहेत. याबाबत काकती पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हल्लेखोर खाचू मोनिंग तरळे व अमित पावले यांच्यात जमिनीच्या वाटणीवरून वाद धुमसत होता. शिवाय न्यायालयातही खटला सुरू आहे. तरी देखील शनिवारी दुपारी अमित हा त्याची पत्नी व मुलाला औषध फवारणी करण्यासाठी शेताकडे निघाला होता. यावेळी वाटेत आधीच दबा धरून बसलेल्या खाचू तरळे याने भर गल्लीत डबलबार बंदुकीने अमित पावले याच्यावर हल्ला केला.