चिपळूण-खोपड येथील शेतकरी कुटुंबातील रिद्धी, सिद्धी शिर्के बहिणींची यशोगाथा
राजेश जाधव/ चिपळूण
खोपड गावातील शिर्के या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या रिध्दी व सिध्दी शिर्के या जुळय़ा बहिणींनी आपली घवघवीत यशाची परंपरा कायम राखली आहे. सुट्टी व लॉकडाऊनच्या काळात आंबे व भाजी विकणाऱया सिध्दीने 91.54 टक्के, तर रिध्दी हिने 90.77 टक्के गुण मिळवले आहेत. त्या खेड येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. या दोघींना उच्चशिक्षित करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांची सुरू असलेली धडपड वाखाणण्याजोगी आहे.
या दोघींचे वडील गोंविद शिर्के हे शेतकरी आहेत. आपला शेतीचा व्यवसाय वाढवण्याच्या उद्देशाने ते गेली अनेक वर्षे कुटुंबासह मिरजोळी-साखरवाडी येथे राहतात. त्यामुळे रिध्दी व सिध्दी यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण शहरातील परांजपे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी दलवाई हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मात्र त्या अभ्यासात हुशार असल्याने त्यांनी पाचवीपासून दहावीपर्यंत पहिला व दुसरा क्रमांक कायम राखला आहे. या दोघींनी एलिमेंटरी परीक्षेत ए श्रेणी, तर विज्ञानरंजन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांना चित्रकला, रांगोळी काढण्याचा छंद असून त्यांनी विविध स्तरावर भाग घेऊन यश मिळवले आहे.
दहावीनंतर त्यांना खेडच्या ज्ञानदीप विद्यालयात कॉमर्स विभागात दाखल करण्यात आले. तेथेही शिक्षकांच्या सूचनाप्रमाणे त्यांनी कायम अभ्यास केल्याने 12वी इयत्तेत घवघवीत यश मिळवले आहे. मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी वडील गोविद शिर्के, आई श्रृतिका शिर्के यांची अनोखी धडपड सुरू आहे. मूळगाव खोपड असताना ते मिरजोळी येथे राहत असून शेती कान्हे-पिंपळी येथे करीत आहेत. या शेतात ते कलिंगड, वांगी, दोडकी, कारळी, काकडी आदी प्रकारचे पीक घेत असून ते बाजारपेठेतील व्यापाऱयांना देत आहेत. तसेच काही भागात स्वत: विक्री करीत आहेत. त्यांच्या या कामात सुट्टीदरम्यान रिध्दी व सिध्दीही मदत करीत आहेत. असे असताना त्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास पात्र ठरले आहे.
सीए होण्याचा मानस
या यशाचे शेय त्यांनी आई-वडिलांसह शिक्षकांना दिले आहे. बारावीनंतर सीए होण्याचा या दोघींचा मानस आहे. त्या ज्ञानदीपच्याच शाखेत प्रवेश घेणार असल्याचे गोविंद शिर्के यांनी सांगितले.