शिवसेनेचे पोलिसांना निवेदन
सावंतवाडी:
सावंतवाडी बाजारपेठेत येणारा भाजीपाला, धान्यसाठा, दूध, फळे बेळगाव, संकेश्वर, कोल्हापूर या भागातून येत आहेत. कोल्हापूर, बेळगाव, संकेश्वर भागात कोरोनाबाधित रुग्ण बऱयाच प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे या मार्गावरून येणाऱया वाहनांच्या तपासणीसाठी आंबोली बाजारपेठेत असलेली पोलीस तपासणी चौकी आजरा फाटा येथे सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर उपस्थित होते.
‘कोरोना’ व्हायरसने देशासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग ‘कोरोना’मुक्त ठेवण्यात यश आले आहे. बेळगाव, संकेश्वर, कोल्हापूर या भागातून येणाऱया वाहनातून अनोळखी प्रवासी, चालक ‘कोरोना’बाधित असू शकतो. आंबोली तपासणी नाक्यावर तपासणी करताना त्याचा फटका पोलीस, आंबोली ग्रामस्थ, सावंतवाडीकरांना बसू शकतो. त्यामुळे आंबोली बाजारपेठेत असलेली पोलीस चौकी आजार फाटा येथे न्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय ‘रेड झोन’मधून येणाऱया प्रत्येक वाहनाची तपासणी, तसेच कोरोना विरोधातील लढय़ात सरकारी नियमांचे पालन होते की नाही, याची पाहणी करावी. बेळगाव, संकेश्वरमधून भाजीपाला आणणाऱयांची आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी राऊळ यांनी केली आहे.