प्रतिनिधी / मडगाव
‘हाच आपला मुलगा’ असे टाहो फोडून एका आईने सांगितले तेव्हा पोलिसांच्या डोळय़ातही पाणी तरारले.
मूळ वेंगुर्ला येथील 17 वर्षीय गोपाळ अरुण धुरी. चिंचोणे गावात असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी राहून चिंचोणे येथील माऊंट मॅरी उच्च माध्यमीक विद्यालयात शिकणारा विद्यार्थी. आपल्या एका मित्राबरोबर तळेबांद -चिंचोणे येथील नदीत मासे म्हणून पकडायला गेला असता नदीच्या पाण्याच्या प्रवाहात पाण्यात बुडाला होता.
ही घटना सोमवारची होती. मात्र त्याचा पत्ता लागत नव्हता वा मृतदेहही सापडत नव्हता. मात्र तपास यंत्रणेतर्फे शोधाशोध चालू होती. मंगळवारी गोपाळ याचा मृतदेह केळशी येथे तरंगु लागला आणि मडगावच्या अग्नी शमन दलाच्या जवानानी हा मृतदेह वर काढला.
मात्र हा मृतदेह बुडालेल्या गोपाळ धुरी याचाच, हे ओळखणार कोण? एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख करण्यासाठी यावे अशी पोलिसांनी मयताच्या घरच्याना आवाहन केले आणि गोपाळ याची आई घटनास्थळी आली तेव्हा ती आपल्या पोटच्या गोळय़ाला ओळखली…. आणि समुद्रातून वर काढलेल्या या ओल्या मृतदेहाला मिठी मारुन टाहो फोडू लागली…यावेळी उपस्थितामध्ये पोलीस कर्मचारी होते… यातील काही पोलीस कर्मचाऱयांचे डोळेही पाणावले आणि हृदय हेलावून गेले….