भावुक करणारी 11 वर्षीय मुलाची कहाणी
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला मंगळवारी 13 दिवस पूर्ण झाले आहेत. रशियाकडून युक्रेनमधील अनेक मोठय़ा शहरांमध्ये गोळीबार केला जातोय. युक्रेनमध्ये आता केवळ विध्वंस आणि लोकांचे घाव दिसून येत आहेत. चहुबाजूला ढिगारा, आग, धूर अणि कोसळणाऱया इमारतींसाबत आशाही तुटताना दिसून येत आहे. अशा तणावपूर्ण स्थितीदरम्यान एका 11 वर्षीय मुलाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
युद्धादरम्यान या 11 वर्षीय मुलाने 1 हजार किलोमीटरचे अंतर एकटय़ाने कापले आहे. यादरम्यान या मुलासोबत आईची ममता तसेच वडिलांचे छत्र देखील नव्हते. काही सोबत होते तर ती केवळ जिवंत राहण्याची आशा. युक्रेनला सोडून 1 हजार किलोमीटर अंतरावर हा मुलगा स्लोवाकियामध्ये पोहोचला आहे.
हा मुलगा दक्षिण-पूर्व युक्रेनच्या जपोरिजजियाचा रहिवासी आहे. तेथेच युरोपमधील सर्वात मोठा आण्विक ऊर्जा प्रकल्प आहे. या हिस्स्यावर रशियाने कब्जा केल्याने लोक शहर सोडून पलायन करत आहेत.
आईचे पत्र अन् बॅग
1 हजार किलोमीटरच्या प्रवासादरम्यान या मुलाकडे एक बॅग आणि आईचे पत्र होते, यावर कुणाचा मोबाइल क्रमांक नमूद होता. स्लोवाकियाच्या मंत्रालयाने या मुलाची कहाणी आणि छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या मुलाच्या आईवडिलांना युक्रेनमध्ये रहायचे असल्याने तो एकटाच तिथपर्यंत पोहोचला होता.