प्रतिनिधी/ बेळगाव
विजया हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱया वीरेश हिरेमठ यांनी ‘तायव्वा’ या नावाने आईची महती सांगणारी ध्वनिफीत तयार केली आहे. याचे प्रकाशन येथील हुक्केरी हिरेमठ सभागृहात झाले. याप्रसंगी आशीर्वचन करण्यासाठी चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विजया ऑर्थोचे संचालक डॉ. रवी पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रशेखर स्वामी म्हणाले, आई ही मोठी शिल्पकार आहे. ती सर्व तऱहेचे कष्ट घेऊन आपल्या मुलांना घडविते. म्हणूनच तिला ईश्वरस्वरूप मानले जाते. वीरेश हिरेमठ हे रुग्णांची सेवा करत असून ते उत्तम कार्य आहे. हे काम करतानाच त्यांनी आईचे महत्त्व जाणले आणि ही ध्वनिफीत तयार केली, हे विशेष होय.
यावेळी बोलताना रवी पाटील यांनी, आपल्या सर्व कार्याला आई हीच प्रेरणा असल्याचे सांगितले. प्रत्येक मुलांनी आपल्या माता-पित्यांचा आदर करावा आणि प्रत्येक कार्यासाठी त्यांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी निवृत्त प्राचार्या सुमंगला शिंत्रे यांनी आईचा महिमा हा शब्दातीत आहे. मुलांच्या प्रगतीसाठी आई सर्व तऱहेचे कष्ट घेते. तेव्हा मुलांनी त्यांना विसरू नये, असे सांगितले.
याप्रसंगी गगनदीप कुरळे, संजीव मलादूर, शंकर जयंत्री, आनंद भातकांडे उपस्थित होते. विरुपाक्षी निरलगीमठ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.