तासाभरात रंगतदार ठरले प्रतापगडचे राजकारण
उत्तरप्रदेश निवडणुकीत वेगवेगळे रंग दिसून येत आहेत. एकीकडे एकाच कुटुंबातील लोक वेगवेगळय़ा पक्षांमधून निवडणूक लढवताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे एक आई विरोधकांच्या आघाडीची उमेदवार झाल्यावर मुलीने स्वतःच्या पक्षाचा उमेदवार तिच्या विरोधात उभा न करण्याचा निर्णय घेतला. अपना दलाचे संस्थापक डॉ. सोनेलाल पटेल यांच्या कुटुंबात हा प्रकार घडला आहे. प्रतापगड मतदारसंघात अपना दल (के)च्या तिकिटावर कृष्णा पटेल यांनी अर्ज भरला आहे. हे पाहता अपना दल (एस)ने या मतदारसंघात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. अनुप्रिया पटेल यांनी याची माहिती भाजपला दिली आहे. भाजप आता तेथे उमेदवार उभा करणार आहे.
अपना दल (के)ने या निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. या आघाडीच्या अंतर्गत कृष्णा पटेल यांना उमेदवारी मिळाली आहे. त्या केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या आई आहे. रालोआकडून हा मतदारसंघ अपना दल (एस)ला देण्यात आला होता. कृष्णा पटेल यांनी मंगळवारी या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर अनुप्रिया यांनी हा मतदारसंघ भाजपला देण्याचा निर्णय घेतला आहे.
2015 मध्ये वितुष्ट
डॉ. सोनेलाल पटेल यांच्या निधनानंतर अपना दलात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयन सातत्याने होत राहिला. मुलगी अनुप्रिया पटेल 2014 मध्ये खासदार झाल्यावर राष्ट्रीय राजकारणात गेल्या, तर आई कृष्णा पटेल त्यांची जागा घेऊ पाहत होत्या. परंतु निवडणुकीत पराभूत झाल्यावर कृष्णा पटेल आणि अनुप्रिया यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. अपना दलात 2015 मध्ये फूट पडली.