तोडणी, वाहतुक मजुरीवाढीमुळे उस उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था
एफआरपीला 14 टक्क्यांनी कात्री लागल्याने, अर्थकारण पुन्हा बिघडणार
एल्गार, ऊस परिषदेत रंगणार दराचा फड
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
अवकाळीसारख्या नैसर्गिक संकटाने मेटाकुटीला आलेल्या उस उत्पादक शेतकऱ्याला एफआरपीत घसघशीत वाढ देउन केंद्र सरकारने तारण्याचा प्रयत्न केला. मात्र गव्हाणीत मोळी पडण्यापूर्वीच तोडणी-वाहतुकीच्या दरात 14 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे 90 ते 110 रुपयांपर्यंत एफआरपीमध्येच कपात होणार आहे. या निर्णयामुळे ‘आई जेऊ घालीना आणि बाप थारा देईना’ अशी शेतकऱ्यांची गत झाली आहे. हा नवा मुद्दा घेवून ऊस परिषद, एल्गार परिषदेचे ‘फड’ गाजण्याची शक्यता आहे.
मजुरी वाढीच्या निर्णयाने कारखानदारीच्या अर्थकारणावर काडीचाही परिणाम होणार नाही. मात्र शेतकऱयांचे अर्थकारण नक्की बिघडणार आहे. यंदाच्या हंगामापासून अंमलबजावणी होणार असल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गत वर्षीच्या महापुरामुळे शेतकरी उदवस्त झाला. उभे पीक पाण्याखाली गेल्याने उत्पन्नात 70 ते 80 टक्के घट झाली. यंदा अतिवृष्टीने गाठले. केंद्र सरकारने एफआरपीमध्ये वाढ करुन काहीअंशी आधार दिला होता. मात्र ती वाढही आता मजुरीवाढीने काढुन घेतली आहे.
कारखानदार मालक आणि मुकादमांच्या चर्चेत शेतकरी दुर्लक्षित
मजुरीवाढीसह अन्य मागण्यांसाठी ऊसतोडणी, वाहतुकदारांनी हंगामाच्या तोंडावर आंदोलन हातात घेतले. वेळेत हंगाम सरु न झाल्यास कारखानादारीचे अर्थकारण बिघडेल, यातून शेतकऱ्यांचेही नुकसान होईल अशी भीती निर्माण झाल्याने ऊस तोडणी मजुरांना प्रतिटन 14 टक्के मजुरीवाढ करण्याचा निर्णय घेतला. दर तीन वर्षांनी मजुरीवाढीचा करार होतो. मात्र निर्णय घेत असताना ज्यांच्याकडून ही वसुल होणार आहे. त्याचाही विचार होणे अपेक्षित होते. कारखानदार मालक आणि मुकादमांच्या बैठकीत शेतकरी अथवा त्यांचे प्रतिनिधी कुठेच दिसला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या ऊस परिषदांना एफआरपी अधिक किती यासह मजुरीचा नवा मुद्दा मिळाला आहे.
कारखाना एफआरपी सध्याची वाढीव
(तोडणी-वाहतूक) (तोडणी-वाहतूक)
वारणा 2986.99 632.51 88.56
पंचगंगा 3030.00 690.00 96.9
कुंभी 3118.78 543.47 76.08
बिदी 3075.00 587.13 82.20
भोगावती 2971.20 436.54 61.11
दत्त 2838.19 610.31 85.44
दौलत 2759.30 655.00 91.7
गडहिंग्लज 2778.17 656.33 91.88
शाहू 2971.65 619.35 86.7
जवाहर 2799.55 637.55 89.25
राजाराम 2797.00 574.55 80.43
गायकवाड 2861.00 660.00 92.40
मंडलिक 2865.62 611.38 85.59
शरद 2825.58 608.67 85.21
डी. वाय. 2822.02 657.83 92.09
इंदिरा 2682.43 740.42 103.65
दालमिया 3098.00 687.00 96.18
गुरुदत्त 2836.00 657.02 91.98
हेमरस 29852.00 691.50 96.81
महाडिक 2340.65 662.35 92.72
संताजी 2891.61 687.99 96.31
इकोकेन 2746.55 750.00 105.00