वार्ताहर/ लोकूर
कागवाड तालुक्यातील लोकूर येथे 19 जून रोजी पुणेहून परतलेल्या होमक्वारंटाईन केलेल्या 21 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे तर तिच्या 11 महिन्याच्या मुलीचा आणि क्वारंटाईनमध्ये असलेल्या तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, पुणे येथून 19 जून रोजी महिला, पती आणि 11 महिन्याची मुलगी लोकूर येथे परतले होते. लहान मुलगी असल्याने आई आणि मुलीला होमक्वारंटाईन केले होते. तिच्या पतीला येथील सरकारी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले होते. दरम्यान मंगळवार दि. 23 रोजी सदर स्वॅबचे अहवाल आले असून महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तहसीलदार, वैद्याधिकाऱयांची लोकूरला भेट
पतीला अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्याला अद्याप क्वारंटाईनमध्येच ठेवण्यात आले आहे. तसेच तिच्या अकरा महिन्याच्या मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला असून तिला होमक्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच दरम्यान तहशीलदार प्रमिला देशपांडे, पीएसआय हनमंत धर्मट्टी, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पलता सुनंदकल्ल आदींनी घटनास्थळी भेट दिली. बेळगाव येथून आलेल्या रुग्णवाहिकेतून कोरोनाबाधित महिलेला बेळगाव येथील कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गावातील व्यवहार तीन दिवस राहणार बंद
सदर महिला पुणे येथून परतल्यानंतर होमक्वारंटाईन होती. सदर घर लोकवस्तीपासून थोडय़ा अंतरावर आहे. असे असले तरी सदर परिसर खबरदारीसाठी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. यामुळे गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनीही मंगळवारी रात्री लोकूरला भेट देऊन तीन-चार दिवस दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात यावेत, अशी सूचना केली आहे.