मृतदेहाचे तुकडे फ्रीझमध्ये ठेवले ः श्रद्धा वालकर सदृश प्रकरण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत आणखी एक भीषण हत्या प्रकरण उघडकीस आले असून त्यात आई आणि मुलगा यांनी मिळून बापाची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर बापाच्या मृतदेशाचे 10 तुकडे करून ते फ्रीझमध्ये भरून ठेवण्यात आले. नंतर प्रत्येक दिवशी थेडे तुकडे बाहेर फेकून देण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.
हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अंजन दास असे असून त्याची हत्या 30 मे 2022 या दिवशी करण्यात आली असावी असे अनुमान आहे. अंजन दास याचे वय 45 वर्षांचे होते. त्याची द्वितीय पत्नी पूनम (वय 48) हिने आपला 25 वर्षीय मुलगा दीपक याच्या साहाय्याने ही हत्या केली. दास याच्या मृतदेहाचे काही तुकडे दिल्लीच्या कल्याणपुरी भागातील रामलीला मैदानाच्या जवळ एका बॅगमध्ये भरून फेकण्यात आले होते. त्याचे पाय, हात, कवटी, मांडय़ा आदी अवयव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
अंजन दास याची बिहारमध्ये एक पत्नी असून त्याला त्या पत्नीपासून आठ मुलगे आहेत. तो दिल्लीत कामासाठी रहात होता. दिल्लीत त्याने पूनम नामक आणखी एका महिलेशी विवाह केला. मात्र बिहारमध्ये आपली पत्नी आणि मुले आहेत ही बाब त्याने नव्या पत्नीपासून लपवून ठेवली होती.
झोपेच्या गोळय़ा देऊन हत्या
या प्रकरणी पूनम, दीपक यांना अटक करण्यात आली असून चौकशीत त्यांनी गुन्हय़ाची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दास याला दुधातून झोपेच्या गोळय़ा देण्यात आल्या. तो बेशुद्ध पडल्यावर त्याची हत्या करण्यात आली. नंतर मृतदेहाचे 10 तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीझमध्ये ठेवण्यात आले. नंतर ते टप्प्याटप्प्याने बाहेर फेकण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विविध अनुच्छेदांतर्गत गुन्हा
दोन्ही आरोपींवर हत्या करणे, पुरावा लपविण्याचा प्रयत्न करणे, कटकारस्थान करणे, पोलिसांना खोटी माहिती देणे आदी गुन्हे सादर करण्यात आले आहेत. पूनम हिची पुढील चौकशी सुरू आहे. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी उपयोगात आणले गेलेले शस्त्रही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
खुनाचे कारण
अंजन दास याची आपली सून आणि आपली सावत्र मुलगी यांच्यावर पापदृष्टी होती, असा संशय पूनम आणि तिचा मुलगा दीपक यांना होता. या संशयाच्या कारणास्तव त्यांनी दास यांची हत्या केली. पूनम हिचाही पूर्वी विवाह झालेला होता. तिला एक मुलगा आणि एक मुलगी अशी संतती आहे. अंजन दास याच्याशी विवाह केल्यानंतर ती आपल्या अपत्यांसह त्याच्यासह रहात होती. तिचा मुलगा दीपक याचा विवाह झालेला आहे. या प्रकरणी आणखी पुरावे शोधण्याचे काम सुरू असून लवकरच तपास पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.