2014 मध्ये अमिताभ बच्चन आणि धनुष यांच्या ‘षमिताभ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अक्षर हसन स्वतःचे वडिल कमल हासन, आई सारिका आणि बहिण श्रूती हसनसोबत काम करू इच्छित आहे. तिने एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली आहे.
जाहीरपणे मी माझे वडिल, आई आणि बहिणीसोबत काम करू इच्छिते. मी अत्यंत सन्मान करणारे हे कलाकार आहेत. त्यांचे काम मी जवळून पाहत आले आहे. या तिघांकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा मी त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे अक्षराने म्हटले आहे. सारिका यांच्या 2010 मध्ये प्रदर्शित ‘सोसायटी’ या चित्रपटात अक्षराने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले होते. या चित्रपटाचे दिर्ग्शन राहुल ढोलकिया यांनी केले होते.
अक्षराला बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आतापर्यंत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास यश आलेले नाही. पण तिची बहिण श्रूतीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावले आहे. याचबरोबर श्रूती बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमधून झळकली आहे. तर कमल हासन हे बॉलिवूड तसेच तमिळ चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आहेत.