नवीन खडीकरणाची सरपंच यु. डी. पाटील यांची मागणी
प्रतिनिधी / सरवडे
पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून आकनूर ते मांगेवाडीपर्यंतचा रस्त्याचे ‘बीबीएम’ पद्धतीने खडीकरण केले होते. परंतु थेट पाईपलाईनचे काम करणाऱ्या ‘जीकेसी’ कंपनीने आपले काम करताना हा रस्ता पूर्ण उखडला आहे. मातीचे साम्राज्य पसरलेल्या या रस्त्याचे आता थेट कार्पेट डांबरीकरण अशक्य असून’ जीकेसीने’ या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून द्यावे ,अशी मागणी आकनूरचे सरपंच यु. डी. पाटील यांनी केली आहे .
दुर्गमानवाड ते निपाणी या आंतरराज्य मार्गाचा भाग असलेला मांगेवाडी ते आकनूर हा रस्ता उद्ध्वस्त अवस्थेत होता. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे ‘बीबीएम’ पद्धतीने खडीकरण झाले .कारपेट पद्धतीचे डांबरीकरण करण्यापूर्वी कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्याने रस्त्याचे काम ठप्प झाले होते. गेल्या महिन्यापासून कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईनचे काम करणाऱ्या ‘जीकेसी’ कंपनीने मांगोली फाटा ते मांगेवाडी दरम्यान अजस्त्र क्रेन आणि मोठ्या पोकलेन मशीनचा वापर करून पाईपलाईनसाठी खुदाई सुरू केली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी केलेला रस्ता उध्वस्त झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लाखो रुपये अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत. या रस्त्यावर खुदाईची माती टाकल्यामुळे रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर धुळीचे साम्राज्य पसरत आहे. या रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून कंपनीतर्फे पाणी मारण्याची आवश्यकता आहे. कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्यामुळे प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री पाटील यांनी दिला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अमित पाटील म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेला रस्त्याच्या नुकसानीबाबत कळविले आहे. आठ ते दहा दिवसात काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता केला नाही तर सदर कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भरलेल्या डिपॉझिट मधून रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करून घेण्यात येतील.