कोरोना विषाणूच्या संसर्गाने जागतिक पातळीवर हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूची जनुकीय संरचना समजून घेण्यासाठी सातत्याने संशोधन सुरू आहेच. त्यातून नवीन माहिती समोर येत आहे.
अशीच नवी माहिती कोरोना विषाणू संदर्भात समोर येते आहे. सायन्स जर्नलमध्ये याविषयीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा आकार बदलतो आहे.
संसर्गानंतर कोरानाच्या स्पाईक प्रोटिनचा आकार रॉडसारखा होतो आहे, असा दावा केला आहे अमेरिकेतील बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलच्या संशोधकांच्या चमूने.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूबाबत मिळालेल्या या नव्या माहितीमुळे कोव्हिड 19 प्रतिबंधात्मक लस तयार करणार्या वैज्ञानिकांना मदत होईल.
यानिमित्ताने आधी स्पाईक प्रोटिन म्हणजे काय हे पाहूया. कोरोना विषाणूच्या बाहेरच्या पृष्ठभागावर मुकुटाप्रमाणे दिसणारा जो भाग आहे, तिथून विषाणू प्रोटिन अर्थात प्रथिन बाहेर काढतो. त्याला स्पाईक प्रोटिन असे म्हटले आहे. या प्रोटिनपासूनच संसर्गाची सुरूवात होते.
हे प्रोटिन व्यक्तीच्या एन्झाईम्स एसीई2 रिसेप्टरला चिकटते आणि शरीरापर्यंत पोहोचते. त्यानंतर आपली संख्या वाढवून संसर्ग वाढवते.
एखाद्या व्यक्तीला जेव्हा कोरोनाचा संसर्ग होतो तेव्हा शरीरात संसर्ग पसरवण्यासाठी या स्पाईक प्रोटिनच्या मदतीने पेशींना जखडून ठेवतो. पेशींना संसर्ग झाल्यानंतर विषाणू आपली संख्या वाढवायला सुरूवात करतो, परिणामी रूग्णाची अवस्था नाजूक होऊ लागते.
बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे संशोधक डॉ. बिंग चेन आणि त्यांचा गट या विषाणूवर संशोधन करत आहे. त्यांच्या गटाने क्रायोजेनिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमधून हा विषाणू पाहिला असता अनेक गोष्टी समोर आल्या. संशोधकांच्या असे लक्षात आले की स्पाईक प्रोटिन त्याचा आकार बदलतो आहे.
संसर्ग होण्याआधी या स्पाईक प्रोटिनचा आकार वेगळा आहे आणि संसर्गानंतर त्याचा आकार वेगळाच दिसतो.
त्रिकोणाप्रमाणे दिसणारे हे स्पाईक प्रोटिन संसर्ग झाल्यानंतर मात्र कडक केसाच्या पिनेसारखे दिसते. विषाणूतील स्पाईक प्रोटिनमध्ये हा बदल माणसाच्या रिसेप्टरच्या संपर्कात आल्यानंतर दिसू लागतो. संसर्गानंतर प्रथिनाचा एखाद्या रॉडसारखा किंवा काठीसारखा आकार हा अँटीबॉडीजला विषाणू न्यूट्रल करण्यास मदत करू शकतो.