5 वर्षात 72 विमानांचा ताफा ः मेट्रो ते टायर टू, थ्री शहरांना सेवा
वृत्तसंस्था/ मुंबई
नामवंत आणि मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची हवाई कंपनी आकाश एअर आपल्या विमानसेवेला येत्या जूनमध्ये प्रारंभ करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आकाश एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी या संदर्भातील माहिती विंग्स इंडिया 2022 च्या परिषदेमध्ये दिली आहे.
येत्या जून महिन्यापासून कंपनीची विमानसेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे. जूनमध्येच आपले पहिले व्यावसायिक विमान उड्डाणासाठी सज्ज असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या संदर्भातील तयारी वेगाने सुरू आहे. सर्व नियम अटींचा विचार करून कंपनी सेवा देण्यासाठी पुढे होणार आहे. पुढील पाच वर्षांच्या काळामध्ये 72 विमानांचा ताफा असण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
एकदा विमानसेवा सुरू करण्याआधी 18 विमानांचा ताफा तयार ठेवण्यात असल्याचे समजते. त्यानंतर एकदा सेवा नियमीत झाली की मग दर वर्षाला 12 ते 14 विमाने घेतली जाण्याची योजना बनवली जात आहे. सुरूवातीला कंपनीची विमानसेवा मेट्रो शहरातून टायर टू व टायर थ्री शहरांना असणार आहे.