बेळगाव : चांगळेश्वरी, कलमेश्वर, महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त येळ्ळूर कुस्तीगिर संघटना आयोजित भव्य कुस्ती मैदानात गदेच्या कुस्तीमधून पुरूषांमध्ये आकाश घाडीने निलेश पवार सांगली याच्यावर तर महिलांमध्ये लक्ष्मी पाटील ह. बस्तवाड हिने पिंचिता कारवार हिच्यावर विजय मिळवित गदा बक्षीस मिळविली.
गदेच्या बक्षिसासाठी पुरूष गटात कर्नाटक चॅम्पियन आकाश घाडी येळ्ळूर व निलेश पवार महाराष्ट्र चॅम्पियन यांच्यात लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱयाच मिनिटाला निलेश पवारने एकेरी पट काढून आकाशला खाली घेत आखडी लावली होती. पण आकाश घाडीने खालून आकडी तोडून निलेश पवारवर ताबा मिळवला आणि घिस्सा डावावर चित करून नेत्रदीपक विजय मिळविला. हिंद केसरी, भारत केसरी जस्सापट्टी यांच्या हस्ते गदा देवून त्याचा गौरव करण्यात आला. महिलांमध्ये कर्नाटक चॅम्पियन हलगा बस्तवाडची लक्ष्मी पाटील हिने राष्ट्रीय चॅम्पियन कारवारच्या पिंचिताला चीत केले.