तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
अभिनेत्री कंगणा राणावत हिने मुंबई व संपुर्ण महाराष्ट्रात पोलिसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल करमाळा येथे शिवसेना जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे व महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कंगणा राणावत हिच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड म्हणाल्या की, कंगणा राणावत हीने मुंबई मध्ये येऊन नाव, प्रसिद्धी कमविली आणि त्या मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याबद्दल तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मुंबईत राहायचे असेल तर मुंबई व मुंबई पोलिसांचा सन्मान करावाच लागेल अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल.
महाराष्ट्रातील मुंबई ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, फुले, शाहू, यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्रात आहे. अशा मुंबईला महाराष्ट्रात कंगना राणावत नाव ठेवत असेल तर शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख यांच्या कर्तृत्वावर टीका करण्यापेक्षा आपण कोणत्या संस्कृतीत फिरता, वागता याचे आत्मपरीक्षण करावे असे महेश चिवटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाउपप्रमुख भरत अवताडे, तालुका प्रमुख सुधाकर लावंड, तालुका उपप्रमुख बंडू शिंदे, शहर प्रमुख प्रवीण कटारिया, उप शहरप्रमुख पंकज परदेशी, संजय भालेराव, युवा सेना जिल्हा उपप्रमुख मयूर यादव, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, उपशहर प्रमुख प्रसाद निंबाळकर, शाखा प्रमुख अभिजीत सुरवसे, जेष्ठ शिवसैनिक लाला कुरेशी, तृप्ती मासाळ, भक्ती गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते.