वृत्तसंस्था/ मेलबर्न
2022 साली होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलिया भूषविणार आहे. या स्पर्धेतील सामने ऑस्ट्रेलियाच्या सात प्रमुख शहरामध्ये खेळविले जाणार आहेत. सदर स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहेत.
या आगामी स्पर्धेत एकूण 12 संघाचा समावेश राहील. ऑस्ट्रेलियातील ऍडलेड, ब्रिस्बेन, गिलॉग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या शहरामध्ये एकूण 45 सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर प्रकाश झोतामध्ये खेळविला जाईल. 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन सामने अनुक्रमे सिडनी आणि ऍडलेड ओव्हल येथे आयोजित केले आहेत.
2021 आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विजेंता संघ ठरला. क्रिकेटच्या या क्रीडाप्रकारातील स्पर्धेत प्रथमच ऑस्ट्रेलियाने अजिंक्यपद मिळविले. यजमान ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाण, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांना पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सुपर 12 संघांत थेट प्रवेश दिला जाईल.
या स्पर्धेच्या सुपर 12 संघात स्थान मिळविण्यासाठी कांही संघांसाठी पात्र फेरीची स्पर्धा घेतली जाणार आहे. नामिबिया, स्कॉटलंड, लंका आणि विंडीज या चार संघांना राऊंड-1 मध्ये खेळावे लागणार आहे. या आगामी स्पर्धेच्या सुपर 12 संघात स्थान मिळविण्यासाठी पात्र फेरीच्या दोन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. पहिली स्पर्धा ओमानमध्ये फेब्रुवारीमध्ये तर दुसरी स्पर्धा जून-जुलै दरम्यान झिंबाब्वेत होणार आहे.