वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023-24 च्या प्रो लिग महिलांच्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ पात्र करण्याकरिता कर्णधार सविताचे प्रयत्न राहतील. या आगामी स्पर्धेच्या पात्रतेसाठी भारतीय महिला हॉकी संघाला आगामी नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करावी लागेल. तसेच पुढील वर्षी होणाऱया आशिया स्पर्धेतील पूर्वतयारीला याची मदत होईल असेही कर्णधार सविताने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या आगामी आंतराष्ट्रीय स्पर्धा वेळापत्रकामध्ये नेशन्स चषक हॉकी स्पर्धेला अधिक प्राधान्य दिले जात आहे. ही स्पर्धा प्रमोशन आणि रिलेगेशन पद्धतीची राहील. या स्पर्धेतील चॅम्पियन संघाला 2023-24 च्या प्रो लिग महिला हॉकी स्पर्धेसाठी प्रमोट केले जाईल. 11 ते 17 डिसेंबर दरम्यान व्हॅलेन्सिया येथे नेशन्स चषक महिलांची हॉकी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारताचा ब गटामध्ये समावेश आहे. या गटात कॅनडा, जपान आणि दक्षिण आफ्रिका, त्याचप्रमाणे अ गटात आयर्लंड, इटली, कोरिया आणि यजमान स्पेन यांचा सहभाग आहे. सदर स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ सज्ज झाल्याचे कर्णधार राणेने म्हटले आहे. पुढील वर्षी होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेवरही आमचे लक्ष आहे. या स्पर्धेपूर्वी होणारी प्रत्येक स्पर्धा आमच्या दृष्टीने सरावाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची असल्याचे तिने म्हटले आहे. 2023-24 च्या प्रो लिग महिला हंगामातील पुरुष आणि महिलांच्या विभागातील विजेते संघ 2026 साली होणाऱया विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी तसेच 2028 साली लॉस एंजिल्स येथे होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील.