वृत्तसंस्था/ ढाका
यजमान बांगलादेश आणि लंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला येथे रविवारपासून प्रारंभ होणार आहे. लंकेविरुद्धच्या या मालिकेत बांगलादेश संघाची सत्त्वपरीक्षा राहिल, असे मत संघाचा कर्णधार तमीम इक्बालने व्यक्त केले आहे.
बांगलादेश संघाने आतापर्यंत गेल्या काही दिवसांच्या कालावधीत झालेल्या मायदेशातील वनडे मालिकेत यशस्वी कामगिरी केली आहे. 2018 च्या ऑक्टोबरपासून बांगलादेश संघाने मायदेशात विविध संघांबरोबर 12 वनडे सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. पण झिंबाब्वे आणि लंकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेश संघाला विजयासाठी झगडावे लागले. बांगलादेश आणि लंका यांच्यात यापूर्वी झालेल्या वनडे मालिकेत बांगलादेश संघाला एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेसाठी अनुभवी अष्टपैलू शकीब अल हसनचा संघात समावेश असल्याने बांगलादेशचा संघ या मालिकेत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास कर्णधार तमिम इक्बालने व्यक्त केला आहे. उभय संघात तीन वनडे सामने ढाक्याच्या शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना येत्या रविवारी त्यानंतर दुसरा सामना 25 मे आणि तिसरा सामना 28 मे रोजी होईल.