नवी दिल्ली :
लक्झरी कार निर्मिती करणारी दिग्गज कंपनी ऑडी इंडिया यांनी आगामी वर्षात वाहन विक्रीत सुधारणा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्ष विविध समस्यांचा डोंगर असल्यामुळे अडचणीचे जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. चालू वर्षाच्या शेवटी सणासुदीची खरेदी ग्राहकांकडून होण्याची शक्यता असून यातून विक्रीमध्ये सुधारणा दिसेल असे मत ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लन यांनी व्यक्त केले आहे. अडचणीच्या कालावधीतही कंपनी बाजारातील स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन मॉडेल बाजारात आणण्याची तयारी करणार आहे. तसेच यात स्पोर्ट्स कार्सचाही समावेश राहणार आहे. यामुळे ऑडीसोबत वाहन उद्योगाला 2021 मध्येच 2020च्या तुलनेत वृद्धी प्राप्त करण्याची अपेक्षा असल्याचे ढिल्लन यांनी म्हटले आहे.