वृत्तसंस्था./ पल्लीकेले
2023 साली भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अफगाण संघाने आपले तिकीट आरक्षित केले आहे. सध्या अफगाणचा संघ लंकेच्या दौऱयावर वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना अफगाणने जिंकला तर सोमवारचा दुसरा सामना अफगाणचा झाल्यानंतर लंकेच्या डावावेळी पावसामुळे रद्द करण्यात आला.
आयसीसीच्या पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट सुपरलीग मानांकनात अफगाणचे आता एकूण 115 गुण झाले आहेत. या मानांकन यादीत अफगाणचा संघ सध्या सातव्या स्थानावर आहे. पुढील वषी भारतात होणाऱया विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सुपरलीग मानांकनातील पहिल्या आठ संघांना थेट प्रवेश देण्यात येणार असल्याने अफगाणचे तिकीट निश्चित झाले आहे. लंकेविरुद्धच्या सुरू असलेल्या वनडे मालिकेत अफगाणला जादा 5 गुण मिळाल्याने त्यांची गुणसंख्या आता 115 झाली आहे. मात्र, लंकन संघाचे आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील थेट प्रवेशाची संधी अधांतरी झाली आहे.
पावसामुळे रद्द करण्यात आलेल्या दुसऱया वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणने 48.2 षटकात सर्वबाद 228 धावा जमविल्या. अफगाण संघातील सलामीचा फलंदाज रहमतुल्लाह गुरबाज आणि रहिमत शहा यांनी शानदार अर्धशतके झळकविली. गुरबाजने 73 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 68, रहिमत शाहने 78 चेंडूत 7 चौकारांसह 58, मोहम्मद नबीने 34 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 41, कर्णधार हसमतुल्ला शाहिदीने 2 चौकारांसह 28 धावा जमविल्या. अफगाणच्या डावात 6 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे रजिताने 31 धावात 3 तर तीक्ष्णा आणि कुमारा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. फिरकी गोलंदाज हसरंगा आणि धनंजय डिसिल्वा यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. त्यानंतर लंकेने 2.4 षटकात बिनबाद 10 धावा जमविल्या असताना पावसाला प्रारंभ झाला. पंचांनी पाऊस थांबण्याची वाट पाहिली. पण पावसाने विश्रांती न घेतल्याने पंचांनी हा सामना रद्द केल्याचे जाहीर केले.
संक्षिप्त धावफलक
अफगाण 48.2 षटकात सर्वबाद 228 (गुरबाज 68, रहिमत शहा 58, नबी 41, हसमतुल्ला शाहिदी 28, रजिता 3-31, तीक्षणा 2-49, कुमारा 2-50, हसरंगा 1-39, डिसिल्वा 1-37), लंका 2.4 षटकात बिनबाद 10.