नवीन कायदा लागू : 6 महिन्यांसाठी जीवनावश्यक सेवेत बँकिंग क्षेत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि त्याचा प्रसार यांच्या धास्तीने सरकार विविध प्रकारच्या योजनांसोबत अन्य पर्यायी मार्गांचा वापर करुन जीवनावश्यक सेवांची पुर्तता करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या संकटाच्या काळात केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आगामी सहा महिन्यांसाठी बँकिंग क्षेत्राचा जीवनावश्यक सेवांमध्ये समावेश करणार असल्याची घोषणा केली आहे.
हा बदल इंडस्ट्रीयल डिस्प्यूट कायद्यानुसार नवीन बँकिंग सेवा कायद्यात समावेश करण्यात आल्यामुळे आता कोणत्याही बँक कर्मचारी आणि अधिकाऱयांना संप पुकारता येणार नाही. हा नियम 21 एप्रिलपासून लागू करण्यात आल्याचे सांगितले आहे. आर्थिक सेवा विभागाने नवीन कायद्यासंदर्भातील माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँकेसह अन्य सर्व बँकांना सदरचे परिपत्रक गव्हर्नर, बँकांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले आहे.
नवीन नियम 6 महिन्यांसाठी
आर्थिक मंत्रालयाच्या अधिकारातून अर्थ विभागाकडून 20 एप्रिल रोजी सादर करण्यात आलेल्या परिपत्रकातून याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाने पत्रकाद्वारे बँकिंग क्षेत्र येत्या सहा महिन्यांसाठी जीवनावश्क सेवेत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.