दीड लाखांच्या रोकडसह पाच तोळे दागिने पळवले
प्रतिनिधी/ कराड
दिवाळीच्या तोंडावर चोरटय़ांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. आगाशिवनगर येथील अभिनव कॉलनी, शिवपार्वती कॉलनीत चोरटय़ांनी बंद असलेली तीन घरे फोडली. दोन घरातील एक लाख 75 हजारांची रोकड, सहा तोळ्यांच्या दागिन्यांवर चोरटय़ांनी डल्ला मारला. चोरीच्या घटनांमुळे आगाशिवनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथील अभिनव कॉलनीत तुषार श्रीरंग जाधव यांचे घर आहे. ते कुटुंबासह सणबूरला कामानिमित्त गेले होते. शुक्रवारी रात्रीनंतर चोरटय़ांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील साहित्य बाहेर फेकून दिले. कपाटाच्या कप्प्यातील एक लाख 75 हजारांच्या रोकडवर चोरटय़ांनी डल्ला मारला. कपाटातील एक तोळ्यांच्या तीन साखळ्या, लहान मुलांच्या सोन्याच्या दहा अंगठय़ाही पळवल्या. जाधव यांच्या घरातील सर्व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. बेडमधील साहित्यही उचकटून टाकले. जाधव यांच्या शेजारी संतोष राजाराम भोसले यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडाही चोरांनी तोडला. भोसले कुटुंबासह मुंबईत आहेत. भोसले यांच्या दरवाजाच्या आत आणखी एक दरवाजा असल्याने चोरटय़ांना घरात प्रवेश करता आला नाही.
शिवपार्वती कॉलनीतील हणमंत जगन्नाथ फुके हे पुण्याला एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला कुटुंबासह गेले होते. चोरटय़ांनी त्यांचे बंद घर फोडले. कपाटातील दोन तोळ्यांचे दागिने चोरटय़ांनी गायब केले.
शनिवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे यांनी तपासाच्या सूचना दिल्या. हवालदार मारूती लाटणे, संजय जाधव, तानाजी शिंदे, विनोद माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.