रुग्णांसाठी बेड, वायफाय, गरम पाण्याची सुविधा
प्रतिनिधी / आचरा:
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर विलगीकरण कक्ष उभारण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आचरा हायस्कूल येथे महिला आणि पुरुष यांच्यासाठी 20 बेडचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते फित कापून त्याचे उद्घाटन झाले. दी पीपल्स असोसिएशन आचराचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब यांनी विलगीकरण कक्षाला लागणारा आचरा हायस्कूलचा प्रशस्त हॉल, सोयी सुविधा देत या कोविड सेंटर उभारणीस मोलाचे सहकार्य केले. तहसीलदार पाटणे यांनी या ग्राम विलगीकरण कक्षाबाबत समाधान व्यक्त केले.
गटविकास अधिकारी जाधव, आचरा सरपंच प्रणया टेमकर, स्कूल कमिटी अध्यक्षा नीलिमा सावंत, देवस्थान अध्यक्ष मिलिंद मिराशी, सुधीर सुखटणकर, नीलेश सरजोशी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. शामराव जाधव, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, जयप्रकाश परुळेकर, शंकर मिराशी, मुजफ्फर मुजावर, मुख्याध्यापक गोपाळ परब, अंकुश घुटुकडे, कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
आचरा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणात फैलावला आहे. यादृष्टीने आचऱयातील कोरोना रुग्णांना या ग्राम विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. आचरा हायस्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या या विलगीकरण कक्षात दाखल होणाऱया रुग्णांसाठी बेड, मोफत वायफाय सुविधा, गरम पाण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडी व अन्य सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाच्या उभारणीच्या कामात जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, सरपंच प्रणया टेमकर, जयप्रकाश परुळेकर, पत्रकार परेश सावंत, मुजफ्फर मुजावर, निखील ढेकणे व ग्रामपंचायत कर्मचाऱयांनी मेहनत घेत अवघ्या तीन दिवसांत कक्षाची उभारणी केली. या विलगीकरण कक्षाला विनामोबदला प्रशालेचा प्रशस्त हॉल उपलब्ध करून देणारे डॉ. प्रदीप मिराशी, प्रदीप परब, नीलिमा सावंत तसेच विनामोबदला बेड उपलब्ध करून देणारे देवस्थान अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी, नीलेश सरजोशी, कानविंदे, मंगेश टेमकर यांचे आचरा ग्रामपंचायतीतर्फे सरपंच प्रणया टेमकर यांनी आभार मानले.