प्रसाद नागवेकर/मडगाव
‘लेन्ट’चा 40 दिवसांचा काळ संपवून आज रविवारी इस्टर साजरा करण्यात येणार आहे. गोमंतकीय ख्रिस्तीबांधव नेहमी या सणासाठी उत्साहाने सज्ज होत असतात. येशू ख्रिस्ताच्या पुनर्जन्माचा सण असल्याने त्यांच्या उत्साहाला उधाण येत असते. मात्र यंदा या सणावर कोरोना विषाणूच्या साथीचे सावट असल्याने तसेच लॉकडाऊन लागू केलेला असल्याने दरवर्षीच्या जोमाने हा सण साजरा करण्यात येणार नसला, तरी ख्रिस्तीबांधव त्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘लेन्ट’च्या काळात मांसाहार व्यर्ज असतो. त्यामुळे इस्टरला मांसाहारी पदार्थांची ख्रिस्ती घरांमध्ये रेलचेल असते. इस्टरच्या सणात अंडय़ाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंडय़ातून पिल्लू जन्म घेत असल्याने त्यास पुनर्जन्माचे प्रतीक मानले जाते. येशू ख्रिस्ताचा इस्टरला पुनर्जन्म झाला असे मानले जात असल्याने अंडय़ाला हे महत्त्व आले आहे. इस्टरनिमित्त पेस्ट्रीच्या दुकानांमध्ये अंडाकृती केक तसेच रंगीबेरंगी सजावट केलेली अंडी खरेदी करण्याकडे ख्रिस्तीबांधवांचा जास्त कल असतो. या सणासाठी कोंबडय़ांच्या अंडय़ावर कलाकृती करून ती सजविली जात असतात. हल्लीच्या काळात कोंबडय़ांच्या अंडय़ाच्या जोडीला चॉकलेट्स, जेलीपासून बनविलेल्या अंडाकृती तसेच जेली बिन्स घातलेल्या प्लास्टिक अंडाकृती यांनाही चांगली मागणी राहिलेली आहे. पण लॉकडाऊनमुळे यंदा ख्रिस्तीधर्मियांना नेहमीसारखी त्यांची खरेदी करता आलेली नाही.
तुटवडय़ामुळे कित्येकांची निराशा
सध्या राज्याच्या सीमा बंद असल्याने मांस, चिकन व अंडय़ांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शनिवारी मांस खरेदीसाठी ख्रिस्तीबांधव बाहेर पडले असता काहींना राज्यातील पुरवठा उपयोगी पडला, तर काहींना कोल्ड स्टोअरेजमधून डबाबंद मांस व तयार पदार्थ मिळाल्याने त्यांची सोय झाली. असे असले, तरी कित्येकांच्या पदरी निराशा पडल्याचे दिसून आले.
प्रार्थनासभा मर्यादित, मेजवान्या बंद
सासष्टी तालुक्यात ख्रिस्तीधर्मियांचे प्रमाण मोठे असल्याने या ठिकाणी हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. सासष्टीत अनेक तारांकित हॉटेल्स असून या हॉटेलांतून इस्टरनिमित्त नेहमी खास मेजवान्यांचे आयोजन केले जायचे. मात्र यंदा कोरोनाची साथ व लॉकडाऊनमुळे या मेजवान्या आयोजित करता आलेल्या नाहीत. शनिवारी रात्री राज्यातील चर्चमध्ये विशेष प्रार्थनासभा होत असतात. शनिवारी त्या झाल्या, मात्र फादर व चर्चशी संबंधित आठ-दहा लोकांचीच त्याला उपस्थिती दिसून आली.
घरातूनच प्रार्थना
ख्रिस्तीधर्मियांसाठी काही स्थानिक टीव्ही वाहिन्यांनी थेट चर्चमधून प्रार्थनासभेचे प्रसारण केल्याने आम्ही घरी बसूनच प्रार्थना केल्याची माहिती मडगावातील ब्रुनो मिनेझिस यांनी दिली. सध्या जगभर कोरोनाचे संकट उभे राहिले असून जगभरात इस्टर साजरा करण्यावर बंधने आली आहेत. इटलीतील रोममध्ये अशीच स्थिती आहे. येशू ख्रिस्ताने या संकटातून आम्हाला सोडवावे अशी प्रार्थना आपण केल्याचे डॉरिस फर्नांडिस यांनी सांगितले.