दक्षता म्हणून ६०० पोलीसांची वैद्यकीय तपासणी
कोल्हापूर / प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त धोका पोलिसांना आहे त्यामुळे आज पर्यंत कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या ६४ पोलीस कर्मचाऱ्यांना होम कोरोंन्टाईन केल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. दक्षता म्हणून ६०० पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी देखिल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जगभरामध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत आहे. त्यावर सध्या तरी कोणतेही औषध उपलब्ध नाही. यावर मात करायची असेल तर रोजच्या व्यवहारामध्ये काळजीपूर्वक वागणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सीगचे पालन करणे. वारंवार सैनीटायजरने हात स्वच्छ करणे. घराबाहेर पडताना कायमस्वरूपी मास्कचा वापर करणे आणि स्वतःची काळजी घेणे हाच उपाय आहे. असे असले तरी पोलिस कर्मचाऱ्यांना मात्र कर्तव्यपूर्तीसाठी दिवसभरात विविध ठिकाणी जावे लागते. असंख्य लोकांशी त्यांचा संपर्क येत असतो. त्यामुळेच पोलिसांना कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे.
जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्यांचे संख्याबळ सत्ताविसशे आहे. यापैकी तेवीसशे कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. आता अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी शिथिल केली आहे. त्यामुळे ७५ टक्के व्यवहार सुरू झाले आहेत. घराबाहेर पडताना सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. यापुढे पोलीस नागरिकांचे प्रबोधन करणार नाहीत. ज्याची त्याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. तरीही कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक किट दिले आहे. त्यातूनही किनी टोल नाका किंवा सीपीआर रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावत असताना कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे आज पर्यंत ६४ पोलीस कर्मचाऱ्यांना होम कोरोंन्टाइन करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.